दिनांक १ मे २०२४ वार बुधवार रोजी आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नियोजनाप्रमाणे सकाळी ७.१५ वाजता सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या मैदानावरती उपस्थित झाले. कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, व शाळेचे शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळेच्या पर्यवेक्षक शिक्षिका सबिता होत्या. सकाळी ठीक 7.20 वाजता बँड पथकाच्या साह्याने प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्यासाठी संचालन करून आणण्यात आले. सकाळी ठीक ७.३० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले व प्रतिज्ञा बोलण्यात आली. शाळेतील जय विद्यार्थ्याने महाराष्ट्र दिनाची माहिती सांगितली व सर्व विद्यार्थ्यांसमोर छोटेसे भाषण दिले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सुमधुर आवाजात गायन केले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले आणि संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अरोकिया यांनी सर्व कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्यांचे शब्दरूपी सुमनांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
अशाप्रकारे सेंट स्टॅनिसलॉस हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला.